संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. १ ते २५ सप्टेंबरदरम्यान शहरात विविध ठिकाणी साधारण सहाशे जणांवर कारवाई करीत दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी दिली.
कोरोनापासून बचाव करण्याचा प्राथमिक उपाय म्हणजे मास्क वापरणे होय. मात्र, शहरात दुचाकी, चारचाकी वाहन चालक, प्रवासी, तसेच रस्त्याने पायी जाणारे अनेक जण विनामास्क दिसतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही नियम घातले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्येदेखील पोलीस कारवाईसाठी जाणार आहेत. त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातदेखील विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कारवाईला विरोध करणाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.
............
फोटो नेम : २६०९२०२१ विनामास्क कारवाई, संगमनेर
ओळ : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना शहर पोलिसांचे पथक.