अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या भावाने पुजाऱ्याला सोबत घेऊन अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान यंत्राची पूजा केली होती. याप्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तोफखाना पोलिसांनी श्रीकांत छिंदमला ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी रविवारी (9 डिसेंबर) मतदान झाले. त्यावेळी श्रीकांत छिंदमने पुजाऱ्याला थेट मतदान केंद्रावर आणले आणि ईव्हीएमची पूजा केली. याप्रकरणी प्रशासनाने रात्री उशिरा कारवाई केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीकांत छिंदमसह 8 जणांवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. श्रीपाद छिंदम हा भाजपाचा उपमहापौर होता. छिंदम याने 16 फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता.