मुंबई/शिर्डी : कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. विशेष म्हणजे या परिक्रमेत विविध संत-महंतांसह शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही सहभाग घेतला होता.ग्रीन अॅण्ड क्लीन शिर्डी फाउंडेशन या परिक्रमेचे आयोजन केले होते़ त्या संदर्भात समितीसह जितेंद्र शेळके व अजित संपतलाल पारख या आयोजकांवर गुन्हे नोंदविले गेले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परिक्रमा स्थगित करण्याचा आदेश आयोजकांना दिला होता. मात्र रविवारी सकाळी साडेसहा वाजता खंडोबा मंदिरातून परिक्रमा सुरू झाली़ त्यात महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंद महाराज, नगराध्यक्षा अर्चना कोते, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह हजारो भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोरोनाच्या संदर्भात आदेश मोडल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १५३ व भादंवी कलम १८८ अन्वये हे गुन्हे नोंदविण्यात आले. वाई येथे १३ मार्च रोजी बावधन यात्रेचे आयोजन केले गेले. त्यात पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले. असे गर्दीचे धार्मिक कार्य्रक्रम आयोजित न करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून पाच जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याचे साताºयाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.मॉर्निंग वॉकला गेलो होतोशिर्डीत असताना मॉर्निंग वॉकला जात असतो. रविवारी मॉर्निंग वॉक करताना रस्त्यात परिक्रमावासीय भेटले. त्यांच्याशी चालताना संवाद साधला़ आपण परिक्रमेचा प्रारंभ किंवा सांगतेला उपस्थित नव्हतो, असा दावा खा. लोखंडे यांनी केला आहे.
शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 6:58 AM