पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आवारात असलेल्या जुन्या अभिलेख कक्षाच्या खोलीतील अभिलेखाला ही आग लागली. रात्रपाळीच्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ही बाब पालिकेच्या अग्निशामक दलाला कळवली, परंतु अग्निशामक गाडी घटनास्थळी उशिराने आली. तोपर्यंत अभिलेख कक्षातील जुन्या शिधापत्रिकेचे फॉर्म, शासकीय कागदपत्रे तसेच शेजारी पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालातील काही दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला सूचना दिल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांसह पोलीस कर्मचा-यांनी मदत केली.शासकीय भूखंडावर अतिक्रमणेपोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या व शासकीय धान्य गोदामाला लागून असलेल्या जुन्या अभिलेख कक्षात विजेचे कनेक्शन नाही. परंतु जुना अभिलेख कक्ष व चौकीदार खोली पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या गर्दीत समोरून निदर्शनास येत नाही. तहसील कार्यालयाच्या समोरील शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून टप-या थाटल्याने तहसील कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.