टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील धुमाळ वस्ती, भोंद्रे पठारावरील आगीच्या तांडवामुळे डोंगर वृक्ष संपदेचे मोठे नुकसान झाले. यामुळे हरीण, मोरांसह अन्य वन्य जीवांचे जीव धोक्यात आले असून याकडे वन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
या सततच्या आगींमुळे हे डोंगर काळे बोडखे झाले असून शेतकऱ्यांकडून या डोंगररांगांवर पावसाळ्यानंतर चांगले गवत उगवावे यासाठी आग लावली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या डोंगररांगांना आग लागण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाणवठे आटू लागले आहेत. त्यामुळे टाकळी ढोकेश्वरच्या धुमाळ वस्ती, निवडुंगेवाडी, भोंद्रेच्या डोंगराच्या माळरानावर हरणांचे कळप, मोर, लांडोर यांच्यासह इतर पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या आटलेल्या पाणवठ्यांमथ्ये वन विभागाच्या वतीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.