कोपरगाव : शहरासह ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना मंगळवारी (दि.३०) घडल्या. सुदैवाने नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांच्या पथकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, अचानक लागलेल्या आगीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कोपरगाव - मुर्शदपूर शिव रस्त्यालगत मयुरी सतीश पारेख यांच्या शेतामध्ये आग लागली होती. या आगीत त्यांचे दीड एकर क्षेत्रातील बांबू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. येवला नाक्याजवळ महापारेषण कार्यालयाच्या १३२ केव्ही केंद्राच्या आवारातील काटवनाने दुपारी अडीचच्या सुमारास पेट घेतल्याची दुसरी घटना घडली. या आग लागलेल्या काटवनाजवळ काही अंतरावरच एचपी गॅस सिलेंडरचे गोडाऊन होते. आगीने भडका घेतला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. तर संवत्सर - पढेगाव शिवरस्त्यावरील पद्माकर ठोंबरे यांच्या वस्तीलगत असलेल्या काटवनाला सायंकाळी ५ च्या सुमारास आग लागली होती. या आगीत जवळच असलेल्या ठोंबरे यांच्या वस्तीला धोका निर्माण झाला होता. मात्र, या तीनही ठिकाणच्या आगीवर कोपरगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाच्या पथकाने वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
.............
मार्च, एप्रिल व मे या महिन्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी या तीनही महिन्यांत दक्ष राहणे गरजेचे आहे. कुठे आग लागलीच तर तत्काळ अग्निशमन बंबाच्या पथकाशी संपर्क साधावा जेणेकरून आगीतून होणारी दुर्घटना टाळता येईल.
- संभाजी कार्ले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नगर परिषद, कोपरगाव.