शेवगाव : तालुक्यातील अमरापूर शिवारात जिनिंग मिलला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीत पिंजून तयार झालेल्या कापसाच्या गाठी, इतर यंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास तब्बल ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले.
अमरापूर-तिसगाव रोडवरील वाय. के. कॉटन अँड जिनिंग मिलला पहाटेच्या सुमारास लागलेली आग, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. मिलला पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली असावी असे मिलचे मालक प्रवीण शिंदे यांनी सांगितले.
मिलच्या शेजारी असणारे गोरक्ष बोरुडे यांच्या निदर्शनास आग आल्याने त्यांनी तातडीने जिनिंग मालक प्रवीण शिंदे व नामदेव निकम यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मिलमधील कामगारांना जागे केल्यानंतर तेथील कामगारांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, हवा जास्त वाहत असल्याने आग अधिकच भडकत राहिली. दुपारी दोनच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात दलाला यश आले. मात्र तोपर्यंत पिंजून काढलेल्या कपाशीच्या गाठी, यंत्र जळून खाक झाले होते. आगीत २ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या प्रत्येकी १६५ ते १७५ किलो वजनाच्या १ हजार १०० कपाशीच्या गाठी व अंदाजे १ हजार ५०० क्विंटल सरकी, १ कोटी ३० लाखाचे बेल प्रेस मशिन, बेल प्रेस पॅनल, मेन इलेक्ट्रीक पॅनल, सरकी इलेक्ट्रीक केटर, ६ इलेक्ट्रीक मोटारी, मशिन कॉटन बेल्ट, ट्रॉली फिडर मशिन, एअर कॉम्प्रेसर प्रत्येकी ७० ते ८० लाखाचे बेल प्रेसिंग मशीन, ताडपत्री असे एकूण ३ कोटी ८० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
मिलच्या आवारात मोठ्या प्रमाणात सरकीचा ढीग तसेच लगत ऑईल मिल असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
-----
२२अमरापूर आग, १
अमरापूर येथील जिनिंगला लागलेली आग विझविताना अग्निशमन बंब. दुसऱ्या छायाचित्रात जळालेला कापूस.