काष्टी : काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअरला शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या गस्त पथकामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले.
शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास तुळशी जनरल स्टोअर्स पेटले. दरम्यानच्या काळात पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित यांचे गस्त पथक चालले होते. त्यांनी आग पाहिली आणि तातडीने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना संपर्क केला.
दौलतराव जाधव यांनी मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी फोन केला. तोपर्यत नगरपालिका अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली होती. आदेश नागवडे व उपसरपंच सुनील पाचपुते यांनी नागवडे साखर साखर कारखान्याची अग्नीशमन दलाची गाडी बोलविली. दोन्ही गाड्यांवरील जवानांनी तीन तासात आग आटोक्यात आणली.
या कॉप्लेक्समध्ये महाराष्ट्र बॅक, युनियन बँक, श्रीराम पतसंस्था, युनीयन बॅकेचे एटीएम तसेच एक कृषी सेवा केंद्र आहे. ते सर्व आगीतून बचावले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.