लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी (जि.अहमदनगर): कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या तरुणाने पदयात्रेने येणाऱ्या साई पालखी सोहळ्यात दोन गोळ्या झाडल्या आहेत. यात बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला अन्य पदयात्रींनी पकडून चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे.
या ऑनरकिलिंगच्या घटनेबाबत पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षांपूर्वी नीलेश पवार या तरुणाबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. मुंबईत वाहन चालक म्हणून काम करणारा नीलेश याचा सुखी संसार सुरू होता. मात्र, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे विकी भांगे याच्या मनात नीलेश पवार याच्याविषयी राग होता. तो नीलेशला संपविण्यासाठी संधीच्या शोधातच होता.मुंबईतील गोरेगावची द्वारकाधीश ही साईंची पायी पालखी शिर्डीला निघाली होती. त्यामधून मुंबईतून नीलेश पवार व त्याची पत्नी या पायी शिर्डीला निघाले होते.
विकी हा मुंबईपासूनच त्यांच्या पाळतीवर होता. शुक्रवारी दुपारी ही पालखी शिर्डीजवळील सावळविहीर येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेली असताना, विकीने गावठी कट्ट्यातून मेव्हणा नीलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या नीलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर, पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, विकीला पालखीतील अन्य पदयात्रींनी पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नीलेश पवार व आरोपी विकी भांगे या दोघांनाही उपचारासाठी साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. नीलेशचा धोका टळल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"