पाथर्डी (अहमदनगर) : जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली.गोळीबार करणारा शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे) याच्यासह त्याची पुतणी पुष्पा पानसरे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे), बाळासाहेब कोंडीराम मरकड व शांता भाऊसाहेब दहातोंडे हे सख्खे बहिण-भाऊ आहेत. शांता ही नगर येथे राहते तर उद्धव व बाळासाहेब हे निवडूंगे येथे शेजारी राहतात. उद्धव हा पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे शिक्षक आहे.एक महिन्यापूर्वी उद्धव याने नगर येथील बहिण शांता हिच्या घरी जावून वाद घातला होता. ९ मे रोजी तिसगाव येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी शांता आली होती. त्यावेळी ती निवडंगे येथे भाऊ बाळासाहेब यांच्याकडे मुक्कामी थांबली होती. याचा राग धरून सोमवारी (दि.१४) पहाटे दीड वाजता उद्धव कोंडीराम मरकड याने दारुच्या नशेत बाळासाहेब मरकड यांच्या घरात घुसून पिस्तूलने बाळासाहेब मरकड यांच्यावर गोळी झाडली. पण त्यात ते बचावले.
आले जीवावर, बेतले कुत्रीवर
बाळासाहेब झोपलेले असताना उद्धव मरकड याने गोळी झाडली. पण त्यावेळी त्यांच्या पायथ्याला बसलेली कुत्री उभी राहली आणि बाळासाहेब यांच्यावर झाडलेली गोळी कुत्रीला लागली. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने सर्व लोक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली व उद्धव यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुतणीच्या पिस्तूलमधून गोळीबार
गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल बाळासाहेब यांची पुतणी पुष्पा नीलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार) यांच्या नावावर असून त्यांनी हे पिस्तूल उद्धव यास वापरायला दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे करत आहेत.