बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील भुमीहीन ४५ नागरीकांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी ५०० चौरस फुट जागा महाराष्ट्र शासनाची जागा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून मान्यता दिली आहे. वांगदरीच्या माळरानावर भटक्या कुटुंबांतील राज्यातील पहिली वसाहत उभी राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच वसाहत उभी राहणार आहे.या जागेचा सात बारा उतारा या कुंटुबांच्या नावावर करण्यात आला असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या कुंटुबांना जागा वाटप करण्यात आले आहे. भटक्या विमुक्त जमाती- जमातीतील कुंटुबांना जागेअभावी घरकुले बांधणे अशक्य झाले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विश्वजीत माने यांनी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश तहसीलदार महेंद्र महाजन, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना दिले. वांगदरीचे ग्रामसेवक अनील जगताप यांनी लाभार्थींशी संवाद साधत प्रस्ताव जलद गतीने तयार केला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी यांनीही लक्ष घातले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला खास बाब म्हणून तात्काळ मान्यता दिली. त्यामुळे या जागेवर घरकुल बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे.आम्हाला घरकुलासाठी कोणी जागा देत नव्हते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भटक्यांना घरकुलासाठी शासनाची जागा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे आमचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. - किरण वायदंडे, लाभार्थी