अहमदनगर : अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. हा हप्ता शेतक-यांच्या खात्यात भूसंपादन अधिकारी यांनी वर्ग केला असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिली.
नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ च्या कामाकरीता श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.प्रांताधिका-यांनी मंजूर केलेल्या निवाड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
या प्रस्तावांना मंजुरी देवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी ५० कोटी रूपयांचा पहिला हप्ता शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर झाला असल्याचे खा.विखे यांनी विखे सांगितले.
महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री, तरडगाव, मांडवगण व घोगरगाव या गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी.बी.दिवाण यांनी सांगितले.