अहमदनगर : १० आॅगस्ट १९१८ रोजी मस्तवाल इंग्रज मामलेदाराचा तालुक्यातील जनतेकडून वध करण्यात आला. राक्षसाला मारल्यावर जसा विजयाचा जल्लोष साजरा होतो, तसाच विजयाचा सण अकोले शहरात व तालुक्यात साजरा झाला. नवलेवाडी गावामधील तिघांना मामलेदार वधाच्या शिक्षेत काळ्या पाण्याची शिक्षा झाली. याच गावात स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड रामचंद्र नानाजी तथा बुवासाहेब नवले यांचा जन्म झाला. मजबूत देहयष्टीचे गोरेपान, सतेज कांती व उंचपुरे व्यक्तिमत्त्व़ सात्विक भाव मनी वसलेला़ सर्वांना आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या मोहजालात खेचून आणणारा हा तरूण ऐन उमेदीच्या काळात प्रवरेच्या काठावरील उंचखडक बुद्रूक येथील संत यशवंत बाबा या संताच्या सहवासात रमला व बाबांचा अग्रणी शिष्य बनला. प्रभू रामचंद्रांचे शीतल स्वरूप या तरूणात दिसून यायचे. पुढे ‘बुवासाहेब’ या नावाने सर्वदूर ते परिचित झाले. बुवासाहेब यांना समाज पुढे ‘बाबा’ या नावाने संबोधू लागला. यशवंत बाबा यांचेनंतर बुवासाहेब यांनाच ‘बाबा’ ही उपाधी समाजाकडून मिळाली. दरम्यान भविष्याच्या पोटात मात्र वेगळेच काही शिजत होते. यशवंत बाबांच्या मठाचा अधिपती होणारे बुवासाहेब हे महात्मा गांधीजींच्या विचाराने भारावले. स्वातंत्र्य चळवळीत अध्यात्माची वाट सोडून त्यांनी महात्मा गांधीजींच्या स्वराज्य निर्मितीची वाट धरली. स्वातंत्र्य चळवळीचे ते बिनीचे शिलेदार झाले. स्वातंत्र्य पूर्व काळातील म. गांधींजींच्या काँग्रेसचे ते अकोले तालुक्याचे पहिले अध्यक्ष राहिले. खांद्यावर तिरंगा घेऊन अकोलेच्या तहसील कचेरीवर वैयक्तिक सत्याग्रहाचा म. गांधीजींचा आदेश पाळून आंदोलन करणारे ते पहिले स्वातंत्र्यसेनानी ठरले. १९४० च्या दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीने चांगले पाय रोवले होते. स्त्री-पुरुष समानता सर्वांना शिकण्याचा अधिकार, शिक्षण ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, असे विचार समाजापर्यंत पोहचविण्यात ते पुढे राहिले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा पगडा या चळवळीवर होताच. आंदोलनाचा क्रांतिकारक इतिहास असलेला अकोले तालुका. जुलमी मामलेदाराच्या वधानंतर परत चर्चेत आला तो जंगलच्या सत्याग्रहाने. सप्टेंबर १९३० मध्ये जंगल सत्याग्रह झाला. जिल्ह्यातून व राज्यातून अनेक काँग्रेसचे पुढारी सत्याग्रहासाठी आले. अकोले संगमनेर तालुक्यात या सत्याग्रहाचे स्वरूप मोठे होते. जवळे बाळेश्वर पर्वतरांगातील अकोले तालुक्याच्या लगत ‘पुतळ्या डोंगरावर’ हा सत्याग्रह झाला. जंगलासाठी आणलेला काळा कायदा मोडून जंगल संपत्तीवर जंगलातील रहिवासी असलेल्या माणसांचा हक्क रहावा. आमच्या अधिकारावर आक्रमण करणारे कायदे आम्ही मोडू. हा जंगल सत्याग्रहाचा मुख्य गाभा होता. बुवासाहेब नवले यांच्यासह स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह ऐतिहासिक स्वरूपाचा झाला होता़ शेकडो कार्यकर्त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. काहींना शिक्षाही झाल्या.स्वातंत्र्य चळवळीचा जोर संगमनेर-अकोले तालुक्यात वाढला असताना आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी राजापूरला झालेल्या मिटिंगमध्ये या दोन्ही तालुक्यात प्रतिसरकार स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. नेत्यांचा आदेश येईल त्या दिवशी अकोले व संगमनेर कचेरीवर तिरंगा झेंडा फडकावून कचेरी ताब्यात घ्यावयाची व आपण स्वतंत्र झालो हा ‘पुकारा’ करावयाचा असे आंदोलनाचे स्वरूप निश्चित झाले. चाळीसगाव डांगाणासह मोठा जमाव तहसील कचेरीवर चालून जाण्यासाठी व्यूहरचना आखत होता़ दहा गट तयार करुन प्रत्येक गटाचा गटप्रमुख निश्चित करण्यात आला होता. त्यातील एका गटाचे नेतृत्व बुवासाहेब नवले यांनी केले होते. पांडुरंग भांगरे, बुवासाहेब नवले लक्ष्मण ठाकर अर्थात ठाकूरभाई इत्यादी क्रांतिकारकांनी तालुक्यात फिरून मोठा जमाव नवलेवाडीच्या पश्चिमेस असलेल्या आंबराईत जमा केला. तालुक्यात येणारे सगळे रस्ते अडवण्यात आले होते. दुसºया दिवशी अकोल्याच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकवून कचेरी ताब्यात घेतली जाणार होती. ही स्वातंत्र्यासाठीची आक्रमक चळवळ होती. सकाळी जमाव कचेरीच्या दिशेने आगेकूच करू लागला. सरकारला ही माहिती अगोदर मिळाली असल्याने कचेरीभोवताली बंदुका रोखून पोलीस सज्ज होते. सशस्त्र पोलीस फौजांनी मोर्चाला मागे रेटीत नेऊन बळाच्या जोरावर मोर्चा पांगवला व कचेरी ताब्यात घेण्याचे व प्रतिसरकार स्थापन करण्याचे हे आंदोलन चिरडले गेले. दुसºया दिवशी बुवासाहेब नवले व पांडुरंग भांगरे यांना अटक वॉरंट निघाले़ अण्णासाहेब शिंदे यांच्यासह हे नेते पट्टाकिल्ल्याच्या पायथ्याला वैतागवाडीत येऊन भूमिगत झाले. पुढील काळात बुवासाहेब नवले यांना स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय नेत्यांचा सहवास लाभला व त्यांच्याबरोबर आंदोलनात सक्रिय काम करण्याची संधीही लाभली. अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, साने गुरुजी, अरुणा असफअली, डॉ. लोहिया, डॉ. अण्णासाहेब शिंदे, कॉ़ पी. बी. कडू पाटील, भाऊसाहेब थोरात (दादा), चंद्रभान आठरे पाटील, रावसाहेब शिंदे, भास्करराव दुर्वे, धर्मा पोखरकर, पांडुरंग भांगरे, कॉ़ राम नागरे यांच्याबरोबर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केले. तसेच तालुक्यातील लक्ष्मण ठाकुर (भाई) आणि वाशेरे, सावरगाव पाट, साकिरवाडी, वैतागवाडी व नवलेवाडी गावातील नागरिकांचा सहभागही त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. या स्वातंत्र्य सेनानींना भूमिगत काळात सुरक्षितपणे सांभाळून त्यांच्यावर मायेची पाखर धरण्याचे काम वैतागवाडीचे दगडू गोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केले. भूमिगत राहून इंग्रज सरकारला जेरीस आणताना सरकारी मालमत्तेचे नुकसान, मोडतोड करणे, नासधूस करणे, दळणवळणाची व्यवस्था मोडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, खांब मोडणे व संधी मिळेल त्यानुसार गावोगावी नागरिकांचे प्रबोधन करून इंग्रज सरकारला जेरीस आणणे हे त्यांचे काम होते. अखेर स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्यास सुरुवात झाली. नाशिकचा तुरुंग त्यावेळेस नव्याने बांधला होता. सिंध प्रांतातील ‘हर’ जमातीचे बंड मोडून काढण्यासाठी काही बंडखोरांना या जेलमध्ये डांबले होते. स्वातंत्र्यसेनानी बुवासाहेब नवले यांची रवानगी याच जेलमध्ये झाली. त्यांच्यासमवेत त्यावेळी सुरुवातीस नरसू सहादू नवले, चिमणभाई मेहता, साकूरचे फिरोदिया, डॉ़ अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात इत्यादी मान्यवरांना याच जेलमध्ये आणले. नवलेवाडीतील २५ पुरुषांना याच जेलमध्ये डांबले़ सहा महिने ते चोवीस महिन्यापर्यंत कारावास या स्वातंत्र्यसेनानींना भोगावा लागला. चार-पाच महिन्यातच जेलमध्ये १५ कार्यकर्त्यांचा एक अभ्यास गट तयार झाला. डॉ़ अण्णासाहेब शिंदे हे वर्तमानपत्रासह इतर जागतिक पातळीवर माहितीची टिपणे काढून तुरुंगातील या सहकाºयांचे प्रबोधन करीत असत. याच दरम्यान महात्मा गांधीजी व कस्तुरबा गांधी यांना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्रबाबू व मौलाना आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध केले.नाशिक जेल स्वातंत्र्यसेनानींसाठी जेल नव्हे तर ज्ञानसंपादनाचे केंद्र बनले होते. या जेलमधून सुटका झाल्यानंतर मात्र या सेनानींनी डाव्या चळवळीचा लाल बावटा खांद्यावर घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशन व किसान सभेचे काम जोशात सुरु केले. सिन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यात विडी कामगार युनियन बांधली. कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा आता शेतकरी वर्गाकडे किसान सभेच्या माध्यमातून वळला. सर्वात अधिक दारिद्र्य आदिवासी समाजात होते. ठाणे जिल्ह्यात शामराव व गोदावरी परुळेकर हे दांपत्य आदिवासी (वारली) समाजात काम करीत होते. शेतकरी संघटनेची स्थापना करून ‘किसान सभेच्या’ नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे ऐतिहासिक स्वरूपाचा शेतकरी मेळावा झाला़ ‘टिटवाळा परिषद’ या नावाने किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिषद कम्युनिस्ट चळवळीच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. या परिषदेला संगमनेर-अकोले तालुक्यातील नेते व शेतकरी मोठ्या संख्येत हजर होते. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णा भाऊ साठे व शाहीर गव्हाणकर यांच्या शाहिरीने ही परिषद ऐतिहासिक ठरली. जमीनदार, व्यापारी व सावकार यांच्या अन्यायाविरूद्ध या परिषदेत रणशिंग फुंकले गेले. राज्यात शेतकºयांची ही पहिली युनियन होती. ‘किसान सभा’ नावाने आजही शेतकरी युनियन शेतकºयांसाठी लढत आहे़ याच परिषदेत १९४५ साली किसान सभेचे महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष म्हणून कॉ़ बुवासाहेब नवले यांची निवड झाली. बुवासाहेब तथा ‘बाबा’ टिटवाळा परिषदेवरून गावी आले, तेव्हा नवलेवाडीच्या चावडीवर किसान सभेच्या स्फूर्तीदायी गीतांची शाहिरी मैफील रंगू लागली. ‘‘किसान सभा आमची माउली गं, बाई शेतकºयांची सावली गं’’ हे गीत फारच लोकप्रिय झाले. नवलेवाडीत महिला जात्यावर कम्युनिस्ट चळवळीची गीते गाऊ लागल्या - ‘‘रक्ताने गं रंगला बाई लाल बावटा’’ या गीताचा सूर पहाटे गावात निनादू लागला.बुवासाहेब हे देखणे, उमदे व वरवर शांत वाटणारे़ पण तितकेच कठोर भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलने असंतोषाच्या उद्रेकाच्या ज्वालामुखी ठरल्या. आमच्या विद्यार्थी अवस्थेपासून बाबांना भेटण्याची वेळ आम्हास अनेकदा जेलमध्ये आली. स्वातंत्र्य आंदोलन व कम्युनिस्ट चळवळीत सर्वाधिक कारावास भोगणारा नेता म्हणून श्रद्धेय बुवासाहेब नवले यांचे नाव अग्रभागी आहे़ स्वातंत्र्योत्तर काळात १९७२ च्या नंतर बाबांचे राजकारण समाजकारण एका वेगळ्या दिशेने झेपावले. केवळ संघर्ष आमची भूमिका नाही तर विकासासाठी सुद्धा आम्हीच पुढे राहू, या त्यांच्या भूमिकेने त्यांना ‘विकासपुरुष’ ही कीर्ती प्राप्त करून दिली. त्यांच्यावर रयतेचा असलेला विश्वास व त्यांची दूरदृष्टी ही त्यांची जमेची बाजू ठरली. त्यातूनच शैक्षणिक क्षेत्रात अकोले महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी त्यांचा पुढाकार मोलाचा ठरला. प्रवरा नदीवर सर्वात उंच पूल बांधून दळणवळणात आढळा व प्रवरा खोरे जोडण्याची त्यांच्या दूरदृष्टीची ओळख ठरली. अकोले शहराला पिण्याच्या पाण्याची नळ पाणीपुरवठा योजना आणण्यात तेच अग्रभागी होते. तालुक्यातील पहिली नळ पाणीपुरवठा योजना त्यांनी नवलेवाडीत साकारली. तरुण पिढीला माहितही नसेल, अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीत पहिल्या प्रमोटर मंडळात ते चीफ प्रमोटर होते. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. अकोले शहराच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कम्युनिस्ट पक्षाचा असायचा व मार्गदर्शन बाबांचे असायचे.अत्यंत निकोप मनोवृत्ती, सदाचारी व चांगुलपण जपणारा राजकारणी अशी बाबांची ओळख होती. डावपेचाशिवाय व व्यक्तिगत द्वेष, मत्सरांशिवाय त्यांनी राजकीय जीवनातील प्रवास अजातशत्रू म्हणून केला. अजातशत्रू आजही आहेत, मात्र भूमिका न घेता दांभिकपणे जगणारे. बुवासाहेब नवले यांच्या भूमिका सुस्पष्ट होत्या.
सावकारशाही विरोधी आंदोलन १९४५ नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सावकारशाही विरोधी आंदोलन उभे राहिले. हे जिवंत चळवळीचे बोलके उदाहरण ठरले. सावकारांच्या वह्या जाळणे व सावकारी नष्ट करणे हा कृती कार्यक्रम होता. बुवासाहेबांच्या नेतृत्वाखाली पेटत्या आंदोलनाचे खंदे सैनिक होते कॉ़ मुरलीधर (मास्तर) नवले, किसनराव हांडे, सक्रुभाई मेंगाळ व कुशाबा (आप्पा) नवले. १९४८ ला कम्युनिस्ट पक्षावर बंदी आली. नेते, कार्यकर्ते भूमिगत झाले. या दरम्यान राजापूरचे शेतकरी आंदोलन झाले. या आंदोलनात तीन कार्यकर्ते शहीद झाले. आरपार सभ्य व चारित्र्यसंपन्न जीवन ही बुवासाहेब नवले यांच्या जीवनाची ओळख होती. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा सन्मान म्हणजे त्यांना कम्युनिस्ट पक्षाने साम्यवादाची पंढरी असलेल्या ‘सोव्हिएत रशिया’च्या दौºयावर महिनाभर पाठवले. बाबांना रशिया पाहिल्यानंतर आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटले. रशियावरून आल्यानंतर त्याच धन्यतेच्या भावना उराशी बाळगून त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मधुकर (भाऊ) नवले ( सामाजिक कार्यकर्ते, अकोले )