यंदा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के लागून ७० हजार ५६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या तुलनेत अकरावीची प्रवेश क्षमता ७६ हजार ६०० आहे. त्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ॲानलाइन व ॲाफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ठेवली आहे. १६ ॲागस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याबाबत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रवेशाच्या सूचना दिल्या आहेत. अकरावी सर्व शाखांच्या प्रवेशासाठी सर्व उच्च माध्यमिक शाळांनी स्वतंत्र ॲानलाइन प्रवेशाची लिंक तयार करून प्रवेश अर्ज उपलब्ध करून द्यावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया ॲानलाइन करावी. ग्रामीण भागात ॲानलाइन समस्या असल्यास ॲाफलाइन प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावेत. यावर्षी कोणतीही फी वाढू नये, उलट शासनाच्या निर्देशानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शुल्कात १५ टक्के कपात करण्यात यावी. अनुदानित, नंतर अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित या क्रमाने प्रवेश द्यावेत, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
-------------
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
१६ ते २३ ॲागस्ट - कॅालेजकडून अर्ज घेणे व जमा करणे
२४ ते २५ ॲागस्ट - प्राप्त अर्जांचे संगणकीकरण करणे.
२६ ॲागस्ट - सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करणे.
२८ ॲागस्ट - प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करणे.
२८ ॲागस्ट ते १ सप्टेंबर - प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे.
२ सप्टेंबर - प्रतीक्षा यादी क्रमांक १ जाहीर करणे.
२ ते ४ सप्टेंबर - प्रतीक्षा यादी क्रमांक १ प्रमाणे प्रवेश देणे.
६ सप्टेंबर - प्रतीक्षा यादी क्रमांक २ जाहीर करणे.
६ ते ९ सप्टेंबर - प्रतीक्षा यादी २ प्रमाणे प्रवेश देणे.
११ सप्टेंबर - प्रतीक्षा यादी क्रमांक ३ जाहीर करणे.
११ ते १४ सप्टेंबर- प्रतीक्षा यादी ३ प्रमाणे प्रवेश देणे.
------------------
कोणत्या शाखेत किती जागा
कला -२९६००
वाणिज्य - १०९७०
विज्ञान - ३४०००
---------
महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून, विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कट ऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात पहिल्या यादीत अनेक जण शंभर नंबरी असणार आहेत.
-------------
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ७०५६६
अकरावीची प्रवेश क्षमता - ७६६००
-------------