जामखेड : ‘समृद्ध गाव घडवू या’ या अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरण, चारीजोड प्रकल्प, खोल सलग समतल चर, नदी खोलीकरण, जुन्या बुजलेल्या पोट चाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांचे खोलीकरण झाल्यामुळे आदींमध्ये पहिल्याच पावसात गावे पाणीदार झाली आहेत. खोलीकरण केलेल्या अनेक चाऱ्या पाण्याने तुडुंब भरल्याचे पहावयास मिळत आहे. कायम दुष्काळी परिस्थिती असणारा हा भाग आता पाणी टंचाईमुक्तीकडे वाटचाल करु लागला आहे.
आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, नाम फाउंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने कर्जत-जामखेड तालुक्यातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. जामखेड तालुक्यातील तेलंगशी, जवळके, सावरगाव आदी गावांमध्ये झालेले सलग समतल चरचे काम जिल्ह्यातील सर्वांत लांब अंतराचे काम आहे. हा प्रकल्प ‘पाणी संवर्धनासाठी’ सर्वात परिणामकारक ठरला आहे. पहिल्याच पावसात या चाऱ्यांमध्ये सुमारे दीड कोटी लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे निश्चितच कमी होण्यास आता मदत होणार आहे. अधिकाधिक लोकसहभाग, सामाजिक संस्थांची मदत घेत आमदार पवार करत असलेल्या जलसंधारण कामांमुळे कर्जत-जामखेडची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे.
.......
१० तेलंगशी
जामखेड तालुक्यातील तेलंगशी जवळके भागात पहिल्याच पावसात समतल चरांमध्ये असे पाणी साचले आहे.