श्रीगोंदा : शहरातून जाणाऱ्या लातूर-मुंबई (५४८ डी) राष्ट्रीय महामार्गाचे श्रीगोंदा शहरातील सव्वातीन किमी लांबीच्या कामाचे अगोदर काँक्रिटीकरण होईल. त्यानंतर निधी उपलब्धतेनुसार दोन्ही बाजूने भुयारी गटार व फुटपाथचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
विखे यांनी श्रीगोंदा नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली. लेंडीनाला पुलाची पाहणी केली.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा मनीषा लांडे, प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे, अण्णासाहेब शेलार, मनोहर पोटे, अशोक खेंडके, सुभाष डांगे, रमेश गिरमकर आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण करताना भुयारी गटार, फुटपाथची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी आपण फुटपाथ व भुयारी गटारसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावणार आहोत. मात्र त्याअगोदर काँक्रिट करणे गरजेचे आहे. लिंपणगाव शिवारातील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील लोणी व्यंकनाथ शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाच्या वाढीव कामाला मंजुरी मिळाली आहे. चिखली घाटातील काम सुरू करण्यात आले आहे. श्रीगोंदा शहरात सीएनजी गॅस पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करून श्रीगोंदा शहर उत्तर महाराष्ट्रातील पहिले शहर गॅस सिलिंडरमुक्त होणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विखे यांनी केले.
----
२२ श्रीगोंदा विखे
श्रीगोंदा नगरपालिकेत आढावा बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे.