भाऊसाहेब येवले राहुरी : ऐन पावसाळ्यात खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन व नदीपात्रातून जायकवाडीलाही यंदा पाणी गेले़ तरी देखील यंदा पुन्हा मुळा धरण भरण्याची ऐतिहासिक घटना गेल्या ५० वर्षांत प्रथम घडत आहे़ त्यामुळे यंदा बळीराजाला चार आवर्तन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ मात्र पाण्याची दरवर्षी होणारी नासाडी हे शेतकरी व पाटबंधारे खात्यापुढे मोठे आव्हान असणार आहे़यंदा पाणलोट क्षेत्रावर २२५ मिमी पावसाची नोंद झाली़ याउलट लाभक्षेत्रावर ५० टक्के पाऊस पडला़ त्यामुळे ऐन पावसाळ्यात मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे लागले़ मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून २ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले़ वांबोरी व भागडा चारीतून ७० दशलक्ष घनफूटपाणी सोडण्यात आले़ सध्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार १७८ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ याशिवाय नदी पात्रात १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते़ मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली ७३ हजार हेक्टर तर डाव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र आहे़ मुळा धरणातून चार आवर्तन झाले तर शेती व्यवसायाला उर्जितवस्था निर्माण होते़ सध्या मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यात जमा आहे़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २४ हजार ५६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़ धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे़ सर्वसाधारण दीड महिना पाण्याची आवक सुरू राहणार आहे़ त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने पुन्हा भरणार असून त्यानंतर पुन्हा जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावणार आहे़ धरणाकडे पाण्याची चार हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़मुळा धरण प्रकल्प शेतीसाठी उभारण्यात आला़ मात्र काळाच्या ओघात पिण्यासाठी व उद्योगधंद्यासाठी धरणातील पाण्याला प्राधान्य देण्यात आले़ समन्यायी पाणी वाटपाने जायकवाडी मुळा धरणाच्या पाण्यात वाटेकरी आहे़ यंदा मुळा धरण भरून पाणी वाहिल्याने शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर चार आवर्तने उपलब्ध होणार आहे़ गेल्यावर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ याशिवाय नदीपात्रात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे शेतीला केवळ एका पाण्यावर तहान भागावी लागली होती़ त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली होती़ १५ आॅक्टोबर रोजी पाणी वाटप नियोजन होणार आहे़
खरीप आवर्तनानंतर ५० वर्षांनंतर प्रथमच भरले मुळा धरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 PM