कर्जत तालुक्याला प्रथमच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद : बाळासाहेब साळुंके यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:31 PM2019-07-14T12:31:17+5:302019-07-14T12:32:12+5:30
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.
कर्जत : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब साळुंके यांच्या रूपाने कर्जत तालुक्याला प्रथमच जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे.
तत्कालीन जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष होते. शनिवारी ही प्रतीक्षा संपली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांची निवड केली. त्यांना शनिवारी संगमनेर येथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, अॅड. कैलास शेवाळे, जिल्हा सरचिटणीस तात्यासाहेब ढेरे, राशीन ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकरराव देशमुख, उद्योजक पप्पूशेठ धुमाळ, किशोर तापकीर, मुबारक मोगल आदींसह कर्जत तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब साळुंके यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला प्रथमच हे पद मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.