राहुरी : लॉकडाऊनच्या काळात हाताल काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. यातून नैराश्य आलेल्या राहुरी येथील ३५ वर्षीय खाणकाम करणा-या बाळू गुंजाळ या मजूर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात २९ मे रोजी उघडकीस आली आहे.
बाळू रामभाऊ गुंजाळ (रा.मुलनमाथा, राहुरी) येथे रहात होता. सदर तरूण हा खाणकाम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणा-या नागरिकांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याच नैराश्यातून बाळू गुंजाळ याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. गुंजाळ याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. या कुटुंबाची उपजिवीका त्यांच्यावरच होती.
या घटनेबाबत राहुरी पोलिसांत कैलास रामभाऊ गुंजाळ याच्या फिर्यादीवरून आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.