अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहेत. हे वाद भरोसा सेलकडे दाखल झाल्यानंतर समुपदेशनातून गेल्या साडेआठ महिन्यांत ५५० जोडप्यांचा पुन्हा संसार सुरळीत सुरू झाला आहे.
येथील भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकूण १६२० तक्रारी दाखल झाल्या. यातील ९० टक्के तक्रारदार या महिलांच्या आहेत. उर्वरित दहा टक्क्यांमध्ये पुरुष व काही ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील आहेत. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सेलमधील हेड कॉस्टेबल उमेश इंगवले व इतर समुपदेशकांनी तक्रारदार महिला, तिचा पती व इतर नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. पत्नीला नांदवयाचेच नाही अथवा आता मला सासरी जायचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्या जोडप्यांचे येथील समुपदेशकांनी मनपरविर्तन केले. त्यांना कायदेशीर बाबींची समज देत भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करून दिली. अशा प्रकारे ५५० जोडप्यांचा संसार पुन्हा एकदा आनंदाने फुलला.
--------------------------
नवरा सारखाच मोबाइल पाहतो
महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा तसेच सोशल मीडियाचा अतिवापर हे बहुतांश तक्रारींतील एक कारण आहे. पती मला वेळ देत नाही. सारखा मोबाइलमध्ये बिझी असतो. तो त्याच्या मैत्रिणींशी चॅटिंग करतो. तर पत्नी सारखी मोबाइलमध्ये गुंतलेली असते. सोबतच बायको वारंवार माहेरी जाते, शॉपिंगला सारखे पैसे मागते. आदी शुल्लक कारणांमुळे वाद विकोपाला गेल्याचे दिसतात.
---------------------
वर्षभरात भरोसा सेलकडे दाखल प्रकरणे
एकूण तक्रारी - १६२०
वाद मिटलेले- ५५०
स्वतंत्र निर्णय-३१७
दप्तरी- १४७
कायदेशीर मदतीसाठी- २५
गुन्हा दाखल करण्याची शिफारस- २६७
---------------------------
भरोसा सेलमध्ये दाखल होणारे प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळले जाते. यात ९० टक्यांपेक्षा जास्त प्रकरणे ही पती-पत्नीमधील वादाची असतात. तक्रारीनंतर पती-पत्नीसह त्यांच्या नातेवाइकांना सेलमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांचा संसार सुरळीत व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. एखाद्या महिलेचा सासरी छळ झाल्याच्या बाबी समोर आल्यानंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, तसेच सदर महिलेस पुढील कायदेशीर मदत केली जाते.
- पल्लवी उंबरहंडे, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल