आरोपींमध्ये उदय शिवाजी लिप्टे, ऋषभ भास्कर काळे, सौरभ बाबासाहेब बनकर, भूषण बाबासाहेब राऊत व पुष्कराज किशोर खैरनार यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खासदार लोखंडे यांच्या बंगल्यात घुसून आरोपींनी सुरक्षारक्षकास धक्काबुक्की केली होती. लोखंडे यांच्या अंगरक्षकास त्यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी अंगरक्षक पोलीस हवालदार विनोद उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.
खासदार लोखंडे यांच्या बंगल्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरलेली दोन वाहने लावण्यात आली होती. ही वाहने कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणून वापरली जावीत, अशी मागणी करत आरोपी बंगल्यात घुसले होते. त्यांनी वाहनांवरील कापड काढून त्याचे बेकायदारीत्या व्हिडीओ चित्रण केले होते. घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची भावना उमटली होती.