घोडेगाव : नेवासा तालक्यातील घोडेगावमध्ये गुरुवार (दि.२०) ते सोमवार (दि.२४) असे पाच दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
घोडेगाव येथे गेल्या पंधरा दिवसात दररोज कोराेना बाधितांची संख्या वाढत आहे. येथे कोरोना साखळी तोडण्यासाठी पाच दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरपंच राजेंद्र देसरडा यांनी सांगितले. कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरपंच राजेंद्र देसरडा, पोलीस पाटील बाबासाहेब वैरागर यांनी याबाबतचे पत्रक काढून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
येथील सोनई पाेलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली होती. यावेळी आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी ५६ जणांनी रॅपिड कोरोना चाचणी केली. यामध्ये पाच जण कोरोना बाधित आढळून आले. त्यांना शनिशिंगणापूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.