लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर- शिर्डी महामार्गाच्या काँक्रिटीकरणासह मजबुतीकरणाच्या पाचशे कोटींच्या प्रस्तावास केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली असून, येत्या मार्चअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे.
नगर- शिर्डी महामार्गाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला हाेता. या पार्श्वभूमीवर खा. विखे यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वरील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. नगर- शिर्डी महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गात मोठे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गाची किरकोळ डागडुजी न करता मजबुतीकरण करण्यात यावे, यासाठी विखे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेला आहे. खा. विखे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत प्रस्ताव केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला होता; परंतु या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे हे काम थांबले होते. महामार्गाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, या कामासाठी प्रशासनाकडून निविदा मागिवण्यात येतील. निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या मार्चअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यामुळे नगर- शिर्डी महामार्गाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याचे विखे म्हणाले.
...
व्हीआरडीईचे स्थलांतर नव्हे विस्तारीकरण
अहमदनगर येथील व्हीआरडीईचे अन्यत्र स्थलांतर न करता विस्तार करण्यात येणार आहे, तशी ग्वाही दिल्ली येथील व्हीआरडईच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथील व्हीआरडीईचे इतर ठिकाणी स्थलांतर होणार नाही. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची अचारसंहिता लागू आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
..
सूचना गडकरी भेटीचा फोटा आहे.