पाच एचआरसीटी स्कॅनिंग मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका खरेदीलाही मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
राज्यात गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या गोरगरीब जनतेला पालिकेच्या वतीने पुरेशा सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. दुसऱ्या लाटेमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भाजप व शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या अनेक दिवसांपासून शहरवासीयांना सुविधा पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन सभेमध्ये विषयांना मंजुरी देण्यात आली.
कोपरगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्यात आले. विशेषत: कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या वतीने सुसज्ज कोविड सेंटरसह आरोग्याची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी सातत्याने पालिकेकडे ही मागणी केली होती. त्यास भाजप व शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली, असे उपनगराध्यक्ष निखाडे यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या लाटेचा परिणाम हा विशेषत: लहान बालकांवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये बालकांच्या रुग्णालयाची उभारणी करण्याची मागणी विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यावर युतीच्या नगरसेवकांनी सभेमध्ये चर्चा केली. त्यामुळे लवकरच पालिका प्रशासन इमारतीची पाहणी करून रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहे, असे युतीच्या या नेत्यांनी म्हटले आहे.
---------