अहमदनगर : लसीकरणानंतर नगर शहरातील पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना उलटी, डोकेदुखीचा त्रास होऊन ताप आला आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ताप, डोकेदुखी ही सामान्य लक्षणे असून, त्याला साइड इफेक्ट म्हणता येणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ८७१ आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात काम सुरू केले, तर काही कर्मचारी घरी गेले होते. लस घेतल्यानंतर त्यांना रात्री उलटी, ताप, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामध्ये दोन आरोग्य कर्मचारी महापालिकेतील, दोन आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेमधील, तर एक जिल्हा रुग्णालयातील आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. पाचही कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीची इम्युनिटी कमी असल्यास असा परिणाम होतो, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. एका अंगणावाडी सेविकेला घरी सोडण्यात आले आहे, असेही डॉ. बोरगे यांनी सांगितले.