अहमदनगर: विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास वाकडी ( ता. नेवासा, जि. अहमदनगर ) येथे घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. मयतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.
शेतातील विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक जण गेला. त्याला विहरीतून वर येता येत नव्हते. म्हणून दुसरा उतरला. तोही बुडाला. त्यानंतर इतर तिघेजण अशाचपध्तीने विहीरीत उतरले होते. या विहीरीत स्लरी बनविण्यासाठी गोमुत्र, शेण, डाळीचे पीठ टाकण्यात आलेले होते. त्यामुळे पाण्यात गॅस तयार झाला असण्याची शक्यता आहे. हा गॅस नाका तोंडात जाऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
यासंदर्भात वाकडी गावातील अंकुश काळे म्हणाले, की विहीरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एकजण गेला होता. तो बुडाल्याने त्याला वाचविण्यासाठी दुसरा उतरला. त्यानंतर इतर तिघे उतरले. त्यांना बुडून मृत्यू झाला असून, विहीरीत गोमुत्र, शेण, यामुळे गॅस तयार झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतदेह काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदत कार्य हाती घेतले असल्याचे सांगितले.