पारनेर : बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच वाळू तस्करांना शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथून अटक केल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी तहसिलदार भारती सागरे या पथकासह गेल्या होत्या. यावेळी काही वाळू तस्कारांनी सागरे यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पथकातील इतर कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत सागरे यांना वाचविले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती़ पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला होता. दरम्यान नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिरुर पोलिसांच्या मदतीने आणापूर (ता. शिरुर) येथून पाच आरोपींना अटक केली. विठ्ठल दादाभाऊ कुरंदळे (वय ३६), अक्षय गुंडेराव वाघमारे (वय २२), नरेश बीशू सहाणी (वय ५०), प्रशांत गोवर्धन साबळे (वय २४), तुषार दादाभाऊ दौंडकर (वय २३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.
पारनेरच्या तहसीलदारांवर हल्ला करणा-या शिरुरच्या पाच वाळू तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 6:51 PM