संगमनेर : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास व येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. अहमदनगर जिल्हयातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी सांगितले.तेथे त्यांच्यासोबत संगमनेरातील १५ नागरिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला समजली. हे सर्व जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींनी तातडीने या पंधरा जणांचा शहरातील नाईकवाडपुरा, रेहमतनगर, बागवानपुरा येथून १३ जणांना तर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथून एक असे चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील एक ासंशयिताला संगमनेर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. दरम्यान, त्याची प्रकृती ढासळल्याने व त्याच्या आजाराची लक्षणे कोरोनाशी संबंधीत जाणविल्याने तो उपचार घेत असलेल्या रूग्णालयातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला कळविले. त्यानंतर त्याच्यासह संपर्कात आलेल्या अन्य चौदा व्यक्तींना पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.या सर्वांच्या कुटुंबीयांसह अन्य व्यक्तींचेही विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित राहत असलेल्या परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. हे सर्व आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे. ५३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्हकोरोनाचा प्रादूर्भाव झाल्याच्या संशयावरून संगमनेर परिसरातून एकूण ५३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या कालावधीत या सर्वांना क्वॉरंटाईनही करण्यात आले होते. टप्याटप्प्याने या सर्वांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
संगमनेरातील १५ संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:46 PM