भाऊसाहेब येवलेराहुरी : वडिलांकडून काचेपासून मंदिर बनविण्याचा वारसा मिळाल्यानंतर गेल्या चार दशकात तब्बल पाच हजार मंदिर बनविणारा अभियंता मोहनलाल सोलंकी यांची भटकंती सुरू आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणा-या सोलंकी यांच्यासह चार कुटुंब सध्या पाल ठोकून राहुरी येथील नांदूर रस्त्यालगत मुक्कामी आहे.पालावर महिला, पुरूष व मुले काचेपासून मंदिर बनवितात़ बनविलेले मंदिर व शो पीस घरोघरी जाऊन विकताना कलाकार म्हणून सन्मानही मिळतो, तर काही ठिकाणी कमी किमतीसाठी घासाघीस करतांना कटू अनुभवही येतात.सोळंकी यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असली तरी काचेपासून मंदिर तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मंदिर बनविण्यासाठी आकारानुसार वेळ लागतो. मोठे मंदिर बनविताना दोन दिवस लागतात. याउलट दिवसाला दोन लहान मंदिर होतात. भोपाळ (मध्यप्रदेश) येथील सोळंकी यांची नातेवाईकांसह आठ महिने महाराष्ट्रासह अन्य राज्यात भटकंती सुरू असते. पावसाळयात गावी मोलमजुरी करून उपजीविका करावी लागते. सरकारने दिलेल्या जागेवर बांधलेल्या घरात चार महिने मुक्काम असतो.मंदिर बनविण्यासाठी काच, फेविकॉल, कटर हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. भटकंतीच्या काळात सोळंकी यांना या वस्तू स्थानिक बाजारपेठेत सहज उपलब्ध होतात. मंदिर किती आकाराचे बनवावे?, याचा आराखडा मनात तयार होतो. त्यानंतर काच कटरच्या सहाय्याने कापून सांगाडा तयार केला जातो. काचेवर आकर्षक तुकडे जोडले जातात. त्यामुळे सुबक मंदिर तयार होण्याचा मार्ग मोकळा होतो.मंदिर बनविण्यासाठी घरातील महिला व मुलेही तरबेज आहेत. दिवसभर मंदिर बनविण्याचे काम सुरू असते़ मंदिर तयार झाले की शहर अथवा गावात त्याची विक्री केली जाते. घरोघरी भटकंती करतांना तयार केलेल्या मंदिराला चांगली किंमत मिळेल, याची अपेक्षा असते़ दिलदार ग्राहक कलेची कदर करीत योग्य मोबदला देतात. याउलट घासाघीस करणारे ग्राहक अत्यल्प मोबदला देतात. दोन हजार पेक्षा अधिक गावांमध्ये सोळंकी यांनी भटकंती करीत मंदिरांची विक्री केली. सोळंकी यांच्याबरोबर भाचा मनू राठोड, गंगाराम राठोड, शंकर राठोड यांचेही कुटुंब भटकंंती करते.
अनुभवाच्या शाळेतील अभियंत्याने बांधली पाच हजार काच मंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:34 PM