अहमदनगर: साखर पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पुरवठादाराकडून जिल्ह्यासाठी साखरेचा पुरवठा करण्यात आला असून, लवकरच रेशन दुकानात लाभार्र्थींना प्रति किलो १३ रुपये ५० पैसे दराने साखर उपलब्ध होणार आहे़ साखरेसाठीची लाभार्थींची गेल्या सहा महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे़गेल्या सहा महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाली होती़ राज्यातील साखर कारखान्यांनी हात आखडता घेतला़ त्यामुळे दारिद्रय रेषेखालील लाभार्थींना रेशनकार्डवर मिळणारी साखर बंद झाली़ साखर वगळता इतर धान्याचा पुरवठा होत होता़ परंतु महागडी साखर यादीतूनच गायब झाल्यामुळे लाभार्थींना महागडी साखर खरेदी करावी लागत होती़ रेशनवर साखर मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली़ मागणीची दखल घेऊन अखेर शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना साखरपुरवठा करण्यासाठी पुरवठादार संस्थेची नियुक्ती केली असून, नगर जिल्ह्यासाठीही आॅनलाईन बोली लावण्यात आली होती़ निविदा प्रक्रिया यशस्वी झाली असून, पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे़ संबंधित पुरवठादार संस्थेकडून मागणीनुसार पुरवठा केला आहे़ जिल्ह्यात ४ हजार ७८५ क्विंटल साखरेचा पुरवठा करण्यात आला आहे़ सहा महिन्यानंतर ही साखर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या गोदामात दाखल झाली आहे़ तेथून स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोच केली असून, त्यांच्याकडून लाभार्थींना दिली जाणार आहे़अन्न सुरक्षा कायद्यामुळे गहू व तांदूळ लाभार्र्थींना वाटप केले जात आहेत़ अत्यल्प दरात हे धान्य मिळते़ परंतु महागडी साखर त्यांना मिळत नव्हती़ शासनाने आता साखरेचाही पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार साखर जिल्ह्यासाठी दाखल झाली आहे़ दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्र्थींना यामुळे साखर मिळणार आहे़ प्रत्येक व्यक्तीसाठी ५०० ग्रॅम साखरेचे वाटप केले जाईल़ लाभार्र्थींच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार साखर मिळेल़ रेशनच्या यादीत साखरेचा समावेश होणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे़ नियमित साखरेचा पुरवठा करण्यात येणार असून, स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
पाच हजार क्विंटल साखर दाखल
By admin | Published: August 08, 2014 11:34 PM