केडगाव : नगर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना चांगलाच धक्का दिला आहे. तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास झेंडा फडकला असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. गाडे बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना महाविकास आघाडी सामोरे गेली. ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. चार-पाच ग्रामपंचायती एका जागेवरुन गेल्या आहेत. ५८३ जागांपैकी ३३७ जागा जिंकल्या आहेत. कर्डिले समर्थकांकडून तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर दावा केला जात आहे. याबाबत विचारले असता कर्डिलेंनी कोणत्या, कोणत्या ग्रामपंचायती भाजपाने ताब्यात घेतल्या ते जाहीर करावे असे आव्हान सेनेने दिले. जेऊर गटात इमामपूर ग्रामपंचायत हिच आमच्या ताब्यात होती. आता इमामपूर, जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. जेऊर गटात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. कर्डिले यांच्या गावात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ३० टक्के मतदान मिळाले आहे. भाजपाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच होणार असल्याचा दावा गाडे यांनी यावेळी केला. होऊ घातलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीतही तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र भगत, संपतराव म्हस्के, उद्धवराव दुसुंगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले उपस्थित होते.
....
आता बाजार समितीवर
आघाडीचाच झेंडा फडकणार
नगर तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. सोसायट्यांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र लढणार असून बाजार समितीवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केला.