कोतूळ : पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने मुळा नदीच्या विसर्गात वाढ झाल्याने कोतूळसह परिसराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र कोतुळेश्वर मंदिर गेल्या पाच सहा दिवसापासून पाण्यात गेल्याने भाविकांची दर्शनाची गैरसोय झाली आहे.मुळा नदीवरील ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्प पूर्ण झाल्याने तलावाच्या फुगवट्याने कोतूळेश्वर मंदिराच्या परिसरात चार ते पाच फूट पाणी आले आहे. कोतुळेश्वराचे शिवलिंग पूर्ण पाण्यात बुडाले आहे. तर सभामंडपात सुमारे साडेतीन फूट पाणी आले आहे. मंदिर परिसरातील बहुउद्देशीय सभागृहाची पत्राशेड व तीन खोल्या देखील प्रभावित झाल्या आहेत.मुळा नदीचा विसर्ग ७००० क्यूसेकने असल्यास मंदिरात पाणी जाते. सध्या कोतूळेश्वर मंदिराजवळील विसर्ग सध्या १८००० क्यूसेक असल्याने मंदिर परिसर पाण्याने भरून गेला आहे.सध्या मंदिर परिसरात मुळेला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आहे. कोणत्याही भाविकांनी पाण्यात जावून मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा धोका पत्करू नये. तसेच नदीपात्रात पूर काळात प्रवेश टाळावा.-बी.जे.देशमुख, विश्वस्त, कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट. कोतूळ
मुळा नदीला पूर; कोतूळेश्वर मंदिर पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:03 PM