लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यातील कोविड सेंटरला वेगवेगळ्या स्तरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. तसेच लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या गरजू कुटुंबांनाही दानशुरांकडून मदत केली जात आहे. श्रीगोंदा शहरातील पांडुरंग खेतमाळीस यांनी तीनशे गरजू कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रूपयांच्या किराणा किटचे वाटप केले.
पांडुरंग खेतमाळीस हे हरियाणा राज्याच्या नगररचना विभागाचे उपसंचालक मकरंद खेतमाळीस यांचे वडील आहेत. त्यांचे वय सध्या ६९ वर्ष आहे. तरीही ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, मदतकार्यात उतरले आहेत. त्यांनी किराणा साहित्याबरोबरच आरोग्य विभागाच्या वाहनांना डिझेल दिले असून, कोविड सेंटरसाठी २० गाद्यांची मदत केली आहे. गेल्यावर्षी लाॅकडाऊन काळात त्यांनी एक हजार कुटुंबांना मदत केली होती.
या मदतीचे वाटप प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, अपर तहसीलदार चारुशीला पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यंकनाथ कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामीण विकास केंद्र यांच्या माध्यमातून लोणी व्यंकनाथ येथील संतोष जठार, संतोष भोसले व अभिषेक लडकत हे तिघे तरुण कोविड सेंटर, रूग्णवाहिका, शासकीय कार्यालये विनामूल्य सॅनिटाईझ करत आहेत. संतोष भोसले हा आदिवासी समाजातील बी. एस्सी. अॅग्री झालेला तरुण आहे. त्याला संतोष जठार, अभिषेक लडकत यांची साथ मिळत आहे. या तरुणांच्या उपक्रमामुळे कोविड सेंटर रुग्णालये, रुग्णवाहिका, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे.
दक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी कोविड सेंटर परिसरात जावून कोविड व रुग्णांनी घ्यावयाची काळजी यावर जनजागृती सुरू केली आहे. त्यांचे सहकारी त्यांना या कामात मदत करत आहेत.
---
दिव्यांग कार्यकर्ता धावला मदतीला...
मढेवडगाव येथील दिव्यांग कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांनी लोणी व्यंकनाथ, कोळगाव येथील कोविड सेंटरमधील रुग्णांच्या औषधोपचारासाठी प्रत्येकी अकरा हजारांची मदत केली. यावेळी प्रमोद शिंदे, विजय मांडे उपस्थित होते.
---
श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर
अनेक कार्यकर्ते कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सरसावले आहेत. श्रीगोंदा शहरातील मंगल कार्यालयात ऑक्सिजन सुविधा असलेले ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला. यावेळी सतीश बोरा, मुख्याधिकारी मंगेश देवरे, बाळासाहेब नाहाटा, सुरेश भंडारी, गोरख आळेकर, बाळासाहेब बळे, समीर बोरा, राजेंद्र म्हस्के, संतोष इथापे, महावीर पटवा, राहुल कोठारी, मितेश नाहाटा उपस्थित होते.
---
२५ श्रीगोंदा मदत१
पेडगाव रस्त्यावरील भटक्या विमुक्त जाती-जमातीतील कुटुंबांना किराणाचे वाटप प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, चारुशीला पवार, योगिता ढोले, पांडुरंग खेतमाळीस यांनी केले.