अकोले : आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावर पिवळ्याधमक सोनकिच्या फुलांचा फुलोत्सव बहरला आहे. सोनटिकली, सप्तरंगी घाणेरी, पांढरा रानओवा, रानतेरडा, आभाळी निभाळीची फुले डवरल्याने कळसूबाई-हरिश्चंद्रगड-रतनगड परिसर चैतन्याने न्हाऊन निघाला आहे. शिवारातील शेती बांधावर खुरसणी(काºहळ) ची पिवळीधमक बोंडे फुलली आहेत. नवरात्रोत्सवाचा फलोरा फुलला आहे. रानफुलांचा मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशा फुलांभोवती रुंजी घालू लागल्या आहेत.नवरात्रात सोनेरी पिवळी फुल अधिक असतात. राज्यातील सर्वात उंच शिखर कळसूबाई. पूर्वी आईच्या गडावर जाण्याची वाट बिकट होती. गडावर जाण्यासाठी वन विभागाने निसर्ग पाऊलवाट तयार केल्याने आता मार्ग सुखकर झाला आहे. शासनाने गडावर विद्युतीकरणही केले आहे. इंदोरे, पेंडशेत व उडदावने-पांजरे येथून सुद्धा गायवाटांचे रुपांतर निसर्ग पाऊलवाटात तयार करण्यात आले. गडावर गर्दी नियंत्रणासाठी या वाटांची मदत होते. डोंगर सुळकीवर देवीच छोटे मंदिर आहे. मंदिर छोटे असले तरी नवरात्रात कळसूबाई शिखरावर भाविकांची मांदियाळी असते. आदिवासींच्या भावभक्तीचा चैतन फुलोरा फुलतो. हरिश्चंद्रगडावरील पठार सोनकीच्या फुलांनी बहरला आहे. कळसूबाई शिखरावरीही फुलोत्सवाची पिवळाई दिसू लागली.इंदोरीत इंदोरीकरांच्यामार्गदर्शनाखाली सप्ताहइंदोरीत पद्मावती मंदिरात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० ते १८ आॅक्टोबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. विश्वनाथ महाराज शेटे, सारिका गोडसे, मदन महाराज वर्पे, अमोल महाराज भोत, एकनाथ महाराज शिंदे, प्रकाश महाराज पवार, दत्ता महाराज भोर, देवराम महाराज गायकवाड यांचे कीर्तन होणार आहे. मनोहर महाराज भोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.तालुक्यातील निंब्रळ (अंबिका माता), मोग्रस (मूळमाता), पिंपळगाव निपाणी (सट्टूआई), पिंपळदरी (येडूआई), टाहाकारी (अंबाई), गणोरे(अंबिका), वीरगाव (जगदंबा), रंधा (घोरपडादेवी), गर्दणी (रत्नगिरी), वाघापूर (आऊआई), कळंब (कळंबादेवी), अकोले-परख्तपूर रस्ता (महालक्ष्मी) आदी ठिकाणी प्रामुख्याने नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या ठिकाणचा मंदिर परिसर घटस्थापनेसाठी सिद्ध झाला आहे.
अकोल्यात नवरात्रौत्सवाचा फुलोरा फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:28 AM