पारंपरिक पिके घेऊन हाती काहीच पडत नव्हते. तीन - चार वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला. त्यामुळे शेतीतून हाती काही यायचे नाही. यावर पर्याय म्हणून फळबाग करण्याचे मनात आले. जमिनीची मशागत करून तीन वर्षांपूर्वी संत्राची तब्बल ५ हजार ५०० झाडे लावली. यंदा पहिल्यांदाच बहार धरला. उत्तम प्रतीची फळे झाडांना लागली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी धाव घेत तब्बल ८१ लाखांना बाग खरेदी केली. ही यशोगाथा आहे नगर तालुक्यातील वाळकी गावातील भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याची.
नगर तालुक्याचा अवर्षणग्रस्त भागात समावेश होता. या तालुक्यात कायमच पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. पाण्याच्या प्रश्नावर मात करत अनेक शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे. वाळकी येथील भाऊसाहेब बोठे यांनी २०१९मध्ये संत्राच्या ५ हजार ५०० झाडांची लागवड केली. साडेतीन वर्षात झाडांची योग्य काळजी घेतली. सेंद्रिय शेतीवर भर दिला. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी २ कोटी लीटरचे शेततळे बांधले. त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता भासत नाही. झाडांकरिता ठिबक सिंचन केले. तसेच वेगवेगळी सेंद्रिय खते वापरली. झाडांची पूर्णवेळ काळजी घेतली. औषध फवारणीसाठी आधुनिक पध्दत वापरली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषधांची फवारणी केली जाते. साधारणपणे तीन वर्षात ५० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला. त्यामध्ये यंदाच्या वर्षातील १५ लाखांच्या खर्चाचा समावेश आहे.
यंदा पहिल्यांदाच मृग बहार धरण्यात आला. पहिलाच बहार असल्याने निम्म्याच झाडांना फळे लागली. काही झाडांना कमी प्रमाणात फळे आली. झाडांची चांगली मशागत केल्याने फळांचा आकार आणि चमक उत्तम, गोडी आली. फळे उत्तम असल्याने मागणी होती. व्यापाऱ्यांनी घरी येऊन फळांची खरेदी केली. तब्बल ८१ लाखांना फळे विकली केली. त्यामुळे ५ वर्षात झालेला खर्च निघाला. या यशात घरातील सर्वांनीच हातभार लावला. त्यामुळे यश मिळाले.
पारंपरिक शेती करून कंटाळा आला होता. त्यामुळे फळबागेकडे वळण्याचा मार्ग सूचला. तीन वर्षांपूर्वी ५ हजार ५०० संत्रा झाडांची लागवड केली. झाडांची योग्य काळजी घेतली. यंदा पहिलाच बहार धरला. पहिल्यांदाच ८१ लाखांचा लॉटरी लागली. तीन वर्षात केलेला खर्च निघाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे.
- भाऊसाहेब बोठे, प्रगतशील शेतकरी
...................