सह्याद्रीच्या कुशीत वसलेली कुमशेत, पाचनई अशी आदिवासी खेडी. पावसाळ्यात या परिसरात धो धो पाऊस कोसळतो. गिरीशिखरांच्या पर्वत माथ्यावरून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत कोसळतात. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागतात आणि नीरव शांतता लाभलेल्या परिसरात जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसते. पावसाळ्यात निसर्गाला चढलेला हा तजेला कायम असतानाच गणपतीच्या आगमनाबरोबर येथे फुलोत्सव सुरू होत असतो. तो नवरात्रीपर्यंत किंवा त्याहून पुढे काही दिवस सुरू राहतो. सध्या या परिसरात रस्त्यांच्या कडेला, डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर सोनकीची पिवळी धमक फुले उमलू लागली आहेत.
सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांबरोबर मध्येच डोकावणारे पांढऱ्या शुभ्र लेसरडीची, निळसर हाइंदा, लाल गुलाबी रंगांची डोळाफोड आणि छोट्या कारवींची फुले यात भर घालत आहेत. एकूणच निसर्गाच्या नवलाईने सध्या हा परिसर निसर्गातील रानफुलांच्या सौंदर्याने नटू लागला आहे. या फुलांबरोबरच या परिसरातील थंडगार आणि शुद्ध हवा पर्यटकांना वेगळाच आनंद आणि अनुभव देऊन जाणारी अशीच आहे.
...................
आमचा कुमशेत परिसरातील निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. पावसाळ्यातील येथील जलोत्सव, पाऊस संपता संपता सुरू होणारा फुलोत्सव आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होणारा काजवा महोत्सव पर्यटकांना आकर्षित करणारा असाच आहे. पर्यटकांनी आमच्या भागात भटकंतीसाठी जरूर यावे. परंतु येथील निसर्गाला आणि आमच्या समाज बांधवांना बाधा पोहोचेल असे वर्तन करू नये. पर्यटकांनी येथील निसर्गाच्या मनोहारी आविष्काराचा निखळ आनंद लुटावा.
- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत ग्रामपंचायत