अहमदनगर : पावसामुळे आवक घटल्याने विजयादशमीच्या दिवशी झेंडूच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला़ शुक्रवारी ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर असलेली फुले शनिवारी थेट १५० ते २०० रुपयांनी विकली गेली़ झेंडूसह शेवंती, अष्टर, मोगरा, गुलाब, गुलछडी या फुलांनाही चांगला भाव मिळाला़ दसरा, दिवाळी या सणांसाठी राज्यात फुलांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीने यंदा फूलशेती चांगली बहरली होती. सर्वत्रच फुलांचे मळे दिसत असल्याने उत्पादन वाढून भाव कोसळतील, अशी स्थिती होती. परंतु गेल्या पंधरवड्यात अनेक भागांत अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन तोडायला आलेल्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तर सर्वच फूलशेती पाण्याखाली गेली.फुलांच्या नुकसानीमुळे मागणीऐवढा न झाल्याने फुलांचा दर वाढला़ घाऊक आणि किरकोळ बाजारात फुलांना चांगला दर मिळाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले़ शनिवारी झेंडू (प्रतिकिलो)- २५० ते २००, शेवंती- १५० ते २००, निशिगंध- १०० ते ३००, अस्टर-१५० ते २०० रुपये किलोप्रमाणे विकले गेले़ शनिवारी सकाळी नागरिकांनी मार्केटयार्ड, माळीवाडा, गांधी मैदान, चितळे रोड, दिल्ली गेट, प्रोफेसर परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती़
फुलांनी खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 4:11 PM