अहमदनगर : जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. एकाच पुलाचे तीन नवीन प्रस्ताव यानिमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे उड्डाण प्रस्तावांच्या 'खेळ'खंडोब्यात अधिकच लांबणारे, हे यानिमित्ताने समोर आले आहे. गेल्या सात वर्षांपासून शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम रेंगाळले आहे. भूसंपादनास विलंब झाल्याने पुलाचा खर्च ८८ कोटी २३ लाखांवर गेला आहे. विकासकाने पूर्वीच्या दराने काम करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतली. त्यावर लवाद नेमण्यात आला. प्रशासन व विकासकातील वाद सध्या लवादासमोर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नव्या प्रस्तावाची माहिती दिली. उड्डाणपुलाचे काम विकासकाने केले नाही. त्याबदल्यात टोल वसुलीचा कालावधी कमी करून पुलाचा नवीन अद्ययावत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्वी हा पूल अक्षता गार्डन ते कोठीपर्यंतच र्मयादित होता. तो आता जिल्हा पोलीस अधीक्षक चौकापर्यंत आणला जाणार असून, त्यासाठीचे तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार आहेत. अक्षता गार्डन ते डिएसपी चौकापर्यंतच्या चौपदरी पुलाचा सुमारे ७४0 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय दुपदरीकरणाचे दोन प्रस्ताव आहेत. त्यामध्ये डिएसपी चौकापर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे ३७0 कोटी खर्चाचा प्रस्ताव आहे. तर अक्षता गार्डन ते जुने पाटील हॉस्पिटलपर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे २0५ कोटींचा आराखडा तयार केला गेला आहे. या तिन्हीही प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात येत्या गुरुवारी बैठक होत आहे. शहरातील वाहतुकीत भविष्यात वाढ होणार आहे. सुपा आणि घोडेगाव येथील औद्योगिक वसाहतीचाही विकास होईल. शहराची भविष्याची गरज लक्षात घेऊन उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. त्यासाठी लागणार्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी
>नगर शहरातून जाणारे महामार्ग चार पदरी आहेत. महामार्गावरील अतिक्रमणे काढून ते सहापदरी करावेत, जेणे करून वाहतूक सुरळीत होऊन अपघात होणार नाही, याबाबत खा. दिलीप गांधी यांनी आढावा बैठकीत सूचना केल्या. प्रशासनाच्या कारभारावर टीका करत, काम करा निधीचे आम्ही पाहतो, असे खा.गांधी यावेळी म्हणाले.