शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी उन्हाळी हंगामात कोरोनामुळे पिके शेतातच पडून खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गेल्या हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अवकाळीचा फटका बसला. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. द्राक्ष, डाळिंब, पेरू आदींच्या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अधूनमधून येणाऱ्या ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करून हे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सध्या सुरू आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा जास्त अंत न पाहता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
......................
पाणी असून फायदा नाही
गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. राहाता तालुक्यातील लोणी, दाढ, कोल्हार, बाभळेश्वर, पिंपरी निर्मळ परिसराला वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
.........
शेतात चारा पिकांबरोबर फळबागा आहेत. सध्या गेल्या महिनाभरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत असून पाण्याअभावी पिके करपू लागले आहे. वीज वितरण कंपनीने एकदाचा फॉल्ट शोधून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.
-बाबासाहेब दिघे, शेतकरी,
लोणी, ता. राहाता