बोटा : संगमनेर तालुक्यातील सारोळेपठार शिवारात शेतातील विद्युतपंप सुरु करुन परतणाऱ्या दोन तरुणांचा बिबट्याने पाठलाग केला. प्रसंगावधान राखत तरूणांनी पळ काढल्याने ते थोडक्यात बचावल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.रविवारी रात्री साडेदहाच्या वेळेला शुभम पोखरकर व सुनील मधे हे तरुण शेतातील विद्युतपंप सुरु करुन परतत असताना त्यांना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी काय गुरगुरते म्हणून बॅटरीचा प्रकाश टाकला. त्यात बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच क्षण बिबट्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या तरुणांनी आरडाओरडा करीत पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत येऊन त्यांनी इतर लोकांना माहिती दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनातून संगमनेर वनपरीक्षेत्र कार्यालयाकडे करण्यात आली आहे.बिबट्याच्या वास्तव्याने घबराटसारोळेपठार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून त्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच राजेंद्र फटांगरे यांचे गोठ्यातील गाईवर तीन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सायंकाळच्या वेळेला ब-याचदा बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिकात घबराटीचे वातावरण आहे.
बिबट्याने केला तरुणांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:35 AM