महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यांचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाबतची स्थिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली. या व्हीडिओ कॉन्फरन्सनंतर डॉ. भोसले यांनी माध्यमांमार्फत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. यामध्ये जिल्हाधिकारी म्हणाले, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे लोकांकडून मास्क वापरला जात नसल्याचे दिसते आहे. नियमांचे पालन केले गेले नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करावा लागेल. अनेक ठिकाणी लोक एकत्र येतात आणि नियमांचेही पालन करीत नसल्याचे दिसते आहे.
विवाह सोहळ्याला ५० लोकांचीच सध्या परवानगी आहे. मात्र सध्या हजारोंच्या संख्येने लोक हजेरी लावत आहेत. यापुढे विवाह सोहळ्यांना परवानगी घेणे बंधनकारक असेल. विवाह सोहळ्यास गर्दी दिसल्यास मंगल कार्यालय मालकांवरच कारवाई केली जाईल. याबाबत पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या असून कलम १४९ अन्वये ही कारवाई केली जाईल.
-----------
फेरीवाल्यांची बैठक घेणार
सुपर स्प्रेड ठिकाणे असलेल्या बाजारातील दुकानदार, विक्रेते, फेरीवाले यांची लवकरच बैठक घेण्यात येईल. यामध्ये त्यांना कोरोना प्रादुर्भाव वाढत असून नियमांचे पालन करण्याबाबत काही सूचना दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
-----
चाचण्या वाढविण्यावर भर
सध्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांची सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात येईल. याबाबत खासगी डाॉक्टरांनाही सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांचीही चाचणी करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी आता महापालिकेवर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.