लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेचे तालुक्यात एक लाख ७८ हजार लाभार्थी आहेत. त्यातील सुमारे ८० टक्के लोकांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उर्वरित लोकांनी आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी करावी, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केेले आहे. स्वस्त धान्य दुकानांवरील ई-पॉस उपकरणांमधील आधार व मोबाईल जोडणीच्या सुविधेच्या प्रचार, प्रसारावर सध्या भर देण्यात आला आहे. याकरिता ३१ जानेवारी २०२१पूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने सहकार्य करणे अपेक्षित आहे. धान्य दुकानदारांना तसे आदेश दिल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. लाभार्थ्याने दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा ई-पॉसवर द्यावयाचा आहे. त्यासाठी वापरात असलेल्या मोबाईल क्रमांकाची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.
----------