नेवासा : नेवासा तालुका कृषी कार्यालयात २०१५-१६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस दोन वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी पूर्ण झाली नाही. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या कार्यालयासमोर दीपक धनगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या चौकशीच्या आदेशाचे विधिवत पूजा करून द्वितीय वर्ष श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.विभागीय कृषी सहसंचालक यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी चौकशी अधिकारी यांना दिलेल्या आदेशाला २३ जानेवारी १९ रोजी दोन वर्षे पुर्ण होवुनही अद्याप तालुक्यातील अन्न सुरक्षा' भ्रष्टाचारप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही. आॅक्टोबर महिन्यात पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयाच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न दिपक धनगे यांनी केला होता. यावेळी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांच्याशी चर्चा करून लेखापरिक्षण करण्याचे लेखी आश्वासन देवून १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिले होते. त्यानंतर लेखापरिक्षणासाठी चार व्यक्तीचे पथक तयार केले.हे पथक विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आले होते. या पथकाने लेखापरीक्षण करून तीन महीने होत आले पण पुढे काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यातच असल्याचे धनगे म्हणाले. वेळोवेळी उपोषण, आंदोलने व आत्मदहन करूनही चौकशी पूर्ण न केल्याने चौकशी अधिका-यांसह कृषि अधिकारी सुधीर शिंदे व दोंषीवर निलंबनाची कारवाही करुन व अपहाराची रक्कम वसूल करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन चौकशी अधिकारी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी नागेशजी आघाव, बाळासाहेब लिंगायत, संभाजी माळवदे, भाऊसाहेब वाघ, अभिजित मापारी, पोपट जिरे, सोपान रावडे, गोरक्षनाथ साळुंके, गणेश चौघुले, पोपटराव वाकचौरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अन्न सुरक्षा योजना घोटाळा : नेवासेत द्वितीय वर्षश्राद्ध घालून अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 2:32 PM