संडे विशेष / बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कसे कमी करता येईल यावर गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखली कसे आणता येईल याबाबतही ते जनजागृती करीत आहेत.डॉ. आॅक्सर फ्लुक असे त्या परदेशी अवलियाचे नाव आहे. डॉ. फ्लुक हे गेल्या १७ वर्षापासून मुंबई विद्यापीठात जर्मन भाषेचे व्याख्यान देण्यासाठी येतात. त्यांनी भारतातील विविध भागात जाऊन पाण्याच्या दुर्भिक्ष्याबाबत निरीक्षण केले आहे. त्यांना महाराष्ट्रातील शेती व शेतकºयांची गोडी लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नगर येथील स्नेहालय व श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे या संस्थेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.डॉ. फ्लुक यांनी अलिबाग, मुरूड, राळेगण सिद्धी व चिखली (ता. श्रीगोंदा) येथे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी काय करता येईल. शेतीला कोणत्या वेळी पाणी दिले तर पाण्याची बचत करता येईल यावर प्रयोग केले. संध्याकाळी व सकाळी लवकर पिकाला पाणी दिले तर पाण्याची बचत होते. पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीबाबात ते गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत.लोणीव्यंकनाथला युवकांना मार्गदर्शनफ्लुक यांनी लोणी व्यंकनाथ, चिंभळे येथे तरुणांनी हाती घेतलेल्या वृक्ष लागवड प्रकल्पास भेट दिली. पाण्याचे वाढते बाष्पीभवन व पाण्याची बचत याबात त्यांनी युवकांना धडे दिले. शेतीत करिअर करायचे असेल तर पाण्याचे नियोजन करावेच लागेल, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी बंडू जगताप, गणेश खंडागळे, बापू कोकरे, गणेश जगताप, आशिष काकडे, नामदेव जठार, महेंद्र साळवे, बाळू जगताप, शफिक शेख आदी उपस्थित होते.
पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 4:13 PM