अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. कर्डिले यांनी पोलीस तपासाचा संदर्भ देत ही हत्या १८ एकराच्या भूखंड प्रकरणातून झाल्याचा आरोप करीत हा भूखंड मंत्री तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी पत्रकार दातीर यांनी वारंवार तक्रारी करत कायदेशीर लढा सुरू केला होता. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असून त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.
दातीर यांच्या हत्या प्रकरणात कर्डिले यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्डिले यांच्या आरोपांमुळे या हत्याकांड प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, यामध्ये राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पत्रकार दातीर यांचे राहुरी येथून ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघा आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात बोलताना कर्डिले म्हणाले की, दातीर यांची हत्या झाल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे हे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. मयत दातीर यांची पत्नी आपल्यावर आरोप करते की काय? अशी भीती त्यांना होती. या घटनेची आम्ही मात्र बारकाईने माहिती घेतली आहे. राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा १८ एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित असून सोहम हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. तसेच या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुणा देशमुख व दातीर यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. पठारे कुटुंबीयांनी दातीर यांना या भूखंडासंदर्भात मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर हे कायदेशीर लढाई लढत होते. यासंदर्भातच दातीर यांना आरोपींकडून अनेकवेळा धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच या भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. संगनमताने दातीर यांची हत्या झाली असून राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. यासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून पोलिसांनी मागितले तर ते पुरावे आम्ही त्यांना देऊ, तसेच यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
.................
पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
पत्रकार दातीर खून प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल, मयत दातीर यांच्या पत्नीचा फेर जबाब घेऊन साक्षीदारांचेही गोपनीय पद्धतीने जवाब घेतले जातील. तसेच मयत दातीर यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिवाजी कर्डिले यांना दिले.
...............
पत्रकार परिषद घेऊनच बोलणार
दरम्यान, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या आरोपासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, पत्रकार परिषद घेऊनच यासंदर्भात बोलणार आहे.