कर्जत : कर्जत -जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार विठ्ठलराव सहादू भैलुमे यांचे वृध्दापकाळाने बुधवारी पहाटे निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.१९९०ते १९९५या काळात त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदारकी भुषवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. १९९० साली माजीमंत्री कै.आबासाहेब निंबाळकर यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे समर्थक म्हणून काम केले. त्यांनी पंचायतराज समिती सदस्य, मागासवर्गीय आयोग सदस्य, तमाशा महामंडळाचे सदस्य म्हणुन काम केले. कर्जत तालुक्यात पंचशील शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली. तसेच खेड पाणी योजना, अनेक बंधारे, एस.टी.डेपोसाठी जागा संपादन, के.व्ही.१३२उपकेंद्र, दूरसंचार कार्यालय, १९९४साली इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून घरकुले उभारले.त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना,नातवंडे असा परिवार आहे. कर्जतच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांचे ते सासरे होत.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी कोरेगांव रस्त्यावरील आमदार मळ्यात झाला. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, श्रीगोंद्याचे माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके, सोलापूर रिपाईचे उपाध्यक्ष यशवंत गायकवाड, मल्हारराव घोडके, वाल्मिक निकाळजे, काँग्रेसचे अंबादास पिसाळ,बाळासाहेब साळुंके, किरण पाटील, भाजपाचे अशोक खेडकर, जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड, जामखेड बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर, सागर सदाफूले, बापूसाहेब नेटके, शिवाजी फाळके यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवारांसह समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.