अहमदनगर - अटक वॉरंट प्रकरणात माजी आमदार शंकराव गडाख हे आज स्वत:हून पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले आहेत. मला अटक करावी, अशी मागणी गडाख यांनी पोलिसांसमोर केली आहे. न्यायालयाने मात्र गडाख यांना हजर करण्यासाठी २९ मार्च ही पुढील तारीख दिलेली आहे. गडाख मात्र अटक करा या मागणीवर ठाम आहेत व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसून आहेत. शनिवारी पोलिसांनी गडाख यांच्या अहमदनगर येथील घरी झाडाझडती घेतली होती.
माजी आमदार शंकरराव गडाख यांना शेतकरी आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी गडाख यांच्या नगर येथील घराची झडती घेतली. नेवासा तालुक्यातील वडाळा येथे शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी गडाख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. गडाख हे सुनावणीला हजर राहत नसल्याने न्यायालयाने गडाख यांचे अटक वॉरंट काढले आहे. तसेच १६ मार्च रोजी गडाख यांना हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. पोलिसांनी गडाख यांचा सोनई व नगर येथील त्यांच्या घरी शोध घेतला. नगर येथील गडाखांच्या घराची पोलिसांनी झडतीही घेतली. शंकरराव गडाख हे पुणे येथे गेले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी पोलिसांनी माजी आमदार गडाख मिळाले नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यानंतर आज ते स्वत:हून हजर झाले आहेत.