श्रीगोंदा : थकीत वीज बिलांच्या नावाखाली तालुक्यातील कृषी पंपांना वीज पुरवठा करणारी विद्युत रोहित्र बंद न करता जनजागृती करून थकीत वीज बिल वसुली करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीचे उप अभियंता शरद गांडुळे व अनिल चौघुले यांनी दिले. त्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी उपोषण सोडले.
येथील तहसील कार्यालयासमोर त्यांनी एक दिवस उपोषण केले. कृषी पंपाची थकीत वीजबिल वसूल करण्याच्या नावाखाली महावितरण कंपनीने विद्युत रोहित्र बंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याविरोधात पुरूषोत्तम लगड व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले. शेतीमालास भाव नाही. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे शेतकरी वीजबिल कोठून भरणार. त्यामुळे विद्युत रोहित्र बंद केली तर पिके जळून जातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असेही लगड म्हणाले.
या आंदोलनास केशव मगर, दीपक भोसले, बाळासाहेब महाडीक, प्रा. तुकाराम दरेकर, शहाजी हिरवे, प्रतिभा झिटे, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, अमित लगड, गणेश पालकर यांनी पाठिंबा दिला.