अहमदनगर : येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ. मधुसूदन नागेश बोपर्डीकर (वय ८७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
स्व. बोपर्डीकर यांच्या मागे पत्नी कुमुदिनी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. बोपर्डीकर हे मूळचे वाई (जि. सातारा) येथील होते. नोकरीच्या निमित्ताने ते नगर येथे स्थायिक झाले होते. अहमदनगर महाविद्यालयात काही वर्षे त्यांनी संस्कृत विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी सारडा महाविद्यालयात संस्कृत अध्यापक व प्राचार्य म्हणून काम पाहिले. त्यांचा संगीताचा व्यासंग खूप मोठा होता.
महाराष्ट्र शासनाचा संस्कृतपंडित पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, विद्यावाचस्पती असे अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच संस्कृतमध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली होती. अर्ध मागधीमध्ये ही त्यांचा गाढा अभ्यास होता. संगीतात ते अलंकार परीक्षा उत्तीर्ण होते. ते उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान व रियाज कला मंच या माध्यमातून अनेक विद्यार्थी व कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
----------------