अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, देवेंद्र व सुवेंद्र ही विवाहित मुले, मुलगी श्वेता, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांच्या अकाली निधनाने नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मतदारसंघातील खासदार म्हणून त्यांची नवी दिल्लीमध्ये वेगळी ओळख होती. १९९९, २००९ व २०१४ अशा तीन लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर मतदारसंघातून ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते जहाज बांधणी राज्यमंत्री होते. सव्वा लाख सभासद असलेल्या नगर अर्बन सहकारी बँकेचे ते माजी अध्यक्ष होते.
९ मे १९५१ रोजी जन्मलेल्या गांधी यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. नगरमध्ये ज्यूस सेंटरची गाडी चालवून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ते जनसंघाचे स्वयंसेवक म्हणून राजकारणात आले. पुढे नगरसेवक ते मंत्री असा प्रवास केला. संपूर्ण आयुष्य ते भाजपशी एकनिष्ठ राहिले. भाजपच्या राम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही झाला. खासदारकीच्या काळात नगर जिल्ह्यातील रेल्वे मार्ग, उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पाठपुरावा केला. सन २०१९ मध्ये त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी दिली.
.......
दिल्लीत कोरोनाने घात केला
कोरोना लॉकडाऊनच्या काळात गांधी यांनी नियमांचे काटेकोर पालन करत घराबाहेर जाणे टाळले होते. मात्र, या महिन्याच्या प्रारंभी ते कामानिमित्त नगरहून दिल्लीत गेले व तेथे त्यांना कोरोनाची बाधा झाली.
............
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. अहमदनगर मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभा सदस्य राहिले. ते एक लोकप्रिय जनसेवक होते. अहमदनगर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. मी त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
..............
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत गांधी यांचे मोेठे योगदान राहिले. एक उमदा लोकप्रतिनिधी म्हणून ते स्मरणात राहतील.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
.............
माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना मदत करणाऱ्या योगदानाबद्दल त्यांची आठवण येईल. महाराष्ट्रात भाजपला बळकट करण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
........
दिलीप गांधी यांनी नगरसेवक, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केला. गत ९ मार्चला दिल्लीत मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली होती. त्यामुळे बुधवारी अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सकल जैन समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी व त्यांची नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांबाबत चर्चा होत असे. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो.
- विजय दर्डा, माजी खासदार व सकल जैन समाज राष्ट्रीय अध्यक्ष
.......
माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने एक लोकनेता आपण गमावला. अल्पसंख्याक जैन समाजातून पुढे आलेल्या गांधी यांनी सर्वांना सामावून घेणारे व्यापक राजकारण केले. काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षनिष्ठा व स्व कर्तृत्व या जोरावर ते तीन वेळा खासदार व केंद्रात मंत्री झाले. ते संघर्षमय व धडपड करणारे होते.
- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री व एडिटर इन चीफ लोकमत.